Ad will apear here
Next
लीळा पुस्तकांच्या
पुस्तक या एका गोष्टीचे किती तरी पैलू आहेत आणि त्या प्रत्येक पैलूविषयी लोकं किती आस्था बाळगून आहेत, त्यासाठी किती कष्ट घेऊन लेखन करत आहेत, याची जाण ‘लीळा पुस्तकांच्या’ हे पुस्तक आपल्याला करून देते. विविध पुस्तके आणि लेखकांचा परिचय करून देणारे पुस्तक असूनही ते कंटाळवाणे होत नाही. नुकताच वाचन प्रेरणा दिन होऊन गेला. त्या निमित्ताने, नितीन रिंढे यांनी लिहिलेल्या आणि लोकवाङ्मयगृहाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाविषयी...
...........
इंग्रजीतील पुस्तकवेड्यांच्या धुंद जगाची सफर करायची असेल, तर नितीन रिंढेलिखित ‘लीळा पुस्तकांच्या’ हे पुस्तक जरूर उपयुक्त ठरणारे आहे. लोकवाङ्मयगृहाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकात भेटणारे लेखक आणि पुस्तके यांच्याविषयी आपल्याला माहिती तर मिळतेच; पण कित्येक पुस्तके वाचावीत अशी असोशीही निर्माण होते.

आपल्याकडे अद्यापही वाचन संस्कृती सर्व स्तरांत पोहचलेली नाही. त्यातील पहिले कारण निरक्षरता. अजूनही पुस्तकांविषयी अचाट प्रेम वाटणाऱ्यांची संख्या तशी कमीच आहे; पण जी काही थोडी थोडकी माणसं वाचत आहेत, त्यांच्या वाचनप्रेमाला कुतूहलाची जोड देण्याचे काम कुणी तरी करणे आवश्यक असते. चांगल्या पुस्तकांची ओळख करून देण्याची जबाबदारी कुणीतरी पेलावी लागते. हे काम रिंढे यांनी ‘लीळा पुस्तकांच्या’ या पुस्तकातून केले आहे.

‘लीळा पुस्तकांच्या’ हे पुस्तकांच्या पुस्तकाविषयीचे पुस्तक आहे. म्हणजे परकीय भूभागातील पुस्तकांचा परिचय असे स्वरूप नसून, परकीय देशांतील पुस्तकवेड्या, पुस्तकांसाठी आयुष्य वेचणाऱ्या, पुस्तकांचा संग्रह करणाऱ्या अशा विविधढंगी वाचक-लेखक-विक्रेत्यांविषयीचे हे पुस्तक आहे. रिंढे यांनी ‘पुस्तकांविषयीचे पुस्तक’ याचे सुंदर विवेचन केले आहे. अशी पुस्तके म्हणजे कोणती, तर ज्या पुस्तकाचा विषय पुस्तक ही ‘वस्तू’ असते. परंतु त्याकडे साहित्यिक, भाषिक कृती म्हणून वस्तुनिष्ठरीत्या पाहिले जात नाही. म्हणून ग्रंथसूची, इतिहास, समीक्षा सांगणारी पुस्तके या प्रकारात मोडत नाहीत. उलट पुस्तक या ‘वस्तू’विषयीचे वेगवेगळ्या प्रकारचे आत्मनिष्ठ अनुभव मांडण्याची संधी ज्या प्रकारात मिळते, ती म्हणजे पुस्तकांची पुस्तके. उदाहरणादाखल रिंढे सांगतात, ‘वाचन हा पुस्तकाचा एक उपयोग असला तरी तो एकमेव उद्देश नव्हे, हे पुस्तकांविषयीची पुस्तके वाचताना आपल्या लक्षात येते. जे वाचले त्याचे स्पष्टीकरण किंवा भाष्य देण्याऐवजी वाचनाची प्रत्यक्ष प्रक्रिया कशी होती, वाचनाविषयीच्या सवयी काय आहेत, वैयक्तिक वाचनाचा प्रवास आणि त्यामागची सूत्रे इत्यादी, हे पुस्तकांविषयीच्या पुस्तकांचे विषय होऊ शकतात. एखाद्या वाचकाला अमुक विषयावरची पुस्तके जमवताना कोणते अनुभव आले, पुस्तकांची मुखपृष्ठे, त्यांची बांधणी, त्यांचे एकूणच दृश्यरूप, एखाद्या पुस्तवेड्याला पुस्तकांविषयी वाटणारी असोशी, पुस्तकांच्या जोपासनेसाठी करावी लागणारी यातायात इत्यादी त्या वाचक संग्राहकाच्या व्यक्तिगत अनुभवविश्वाशी संबंधित असलेले विषय पुस्तकांविषयीच्या पुस्तकांमध्ये हाताळलेले असतात.’ पुस्तकांविषयीची पुस्तके हा प्रकार पाश्चात्य संस्कृतीत लोकप्रिय आहे. इंग्रजीत अशा प्रकारची असंख्य पुस्तके प्रकाशित होतात. आपल्याकडील स्थिती मात्र फारशी आनंदी नाही. फार तर परिचयात्मक स्वरूपात लेखन होते; मात्र त्यांचीही पुस्तके झाल्याची फारशी उदाहरणे नाहीत. रिंढे यांचेही पुस्तक हे परिचयात्मक स्वरूपाचेच आहे. 

या पुस्तकाच्या सुरुवातीला रिंढे यांनी ‘विषयांतर’ नामक प्रस्तावना लिहून त्यात आपल्याकडील आणि पाश्चात्य संस्कृतीतील एकूण वाचनाच्या स्थितीचा आढावा घेतला आहे. त्यातून आपल्या वाचनसंस्कृतीत अशी परिचयात्मक पुस्तकेही असणे किती गरजेचे आहे, याचा उलगडा होतो. या विषयांमध्ये रिंढे यांनी पाश्चात्य वाचनसंस्कृती, पुस्तकप्रेमी, पुस्तकविक्रेते आणि आपल्याकडे या प्रकारात केलेले लेखन कशा स्वरूपाचे आहे त्याचे सविस्तर लेखन केले आहे. हे मांडत असताना लेखक, वाचकाबरोबरच प्रकाशक, चित्रकार, पुस्तक रचनाकार, अक्षररचनाकार, मुद्रक, संपादक, वितरक, विक्रेते, संग्राहक यांच्याबाबतही रिंढे यांनी प्रकाशझोत टाकला आहे. किंबहुना लेखक वाचकांइतकेच हे इतरही अनेक प्रकारे जोडले गेलेले घटक किती महत्त्वाचे असतात, हेही त्यांनी सांगितलंय. हे मांडत असताना त्यांनी ‘आपल्याकडील पुस्तकविक्रेत्याने कधी लेखन केले नाही किंवा त्यांच्यावरही कधी लेखन झाले नाही,’ अशी खंत व्यक्त केली. दुर्मीळ पुस्तकांचे दिवंगत विक्रेते पां. रा. ढमढेरे या पुण्यातील पुस्तकविक्रेत्यावर अजूनही लेखन होऊ शकते, असे रिंढे यांनी पुस्तकातून सुचवले आहे.

तसेच रिंढे यांनी आपल्या या पुस्तकात केवळ इतर देशांतल्या पुस्तकांच्या इतिहासाविषयीचा किंवा विविध पैलूंचा आढावा घेतलेला नाही, तर प्रसंगानुसार त्यांनी भारतातील पुस्तकनिर्मितीच्या इतिहासावरील संशोधन, त्याविषयी प्रसिद्ध झालेली पुस्तकं, या विषयांची माहितीदेखील दिलेली आहे. त्या त्या देशांत ज्ञानकोश, शब्दकोश यांच्या निर्मितीसाठी व्यक्तिगत आणि संस्थात्मक पातळीवर कसे काम केले जाते, तिथले समीक्षक-संशोधक कशा तऱ्हेने आपले लेखन अद्ययावत, परिपूर्ण व्हावे यासाठी अपरिमित कष्ट उपसत असतात आणि या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आपल्या देशात काय परिस्थिती आहे, याविषयी ते भाष्य करतात.

पुस्तकाचा पहिलाच लेख ‘अनपॅकिंग माय लायब्ररी’ या प्रसिद्ध भाषणाचा, लेखक वॉल्टर बेंजामिन या लेखकावरचा आहे. वॉल्टर बेंजामिन हा केवळ लेखकच नव्हता, तर पुस्तकवेडा होता. दुर्मीळ पुस्तकांच्या संग्रहाबरोबरच त्याला निरनिराळ्या वस्तू जमवण्याचाही छंद होता. पुस्तकांच्या संग्रहातून एखादे जरी पुस्तक काढून टाकायची वेळ आली, की वॉल्टर कशा क्लृप्त्या लढवायचा हे वाचताना वॉल्टर किती पट्टीचा संग्राहक होता, हे यावरून स्पष्ट होते. इतकेच नव्हे, तर वॉल्टरच्या प्रत्येक लेखनाचा धागा पुस्तक हाच होता. वॉल्टरचे छोटेखानी पुस्तकमय चरित्र या लेखातून वाचायला मिळते.

आपण कितीही वाचन केले, तरी काही पुस्तकांच्या वाचनापासून तरी आपण वंचित राहणार, या गोष्टीने अस्वस्थ झालेल्या स्टुअर्ट केलीवरचा लेख वाचनीय आहे. केलीच्या ‘दी बुक ऑफ लॉस्ट बुक्स’ या पुस्तकातून नाहीशी झालेली पुस्तके कोणती, ती कोणकोणत्या मार्गाने नाहीशी होतात याची माहिती दिली आहे. शिवाय काही पुस्तके काळाच्या टप्प्यावर पुन्हा गवसतात आणि त्यातून विचित्र कसे घडते याविषयीही केलीने उदाहरण दिले आहे.  मिनँडर या प्राचीन ग्रीक नाटककाराला युरोपीय साहित्यात फार नावाजले गेले आहे; पण त्याचे साहित्य उपलब्ध नव्हते. १९०५नंतर त्याच्या काही हस्तलिखितांचे तुकडे सापडले आणि त्यावरून संशोधक-समीक्षकांची घोर निराशा झाली, की ज्याला इतके नावाजले, तो त्याच्या लायक नव्हता. अशा वैचित्र्यपूर्ण अनुभवांचे केलीने केलेले विवेचन रिंढे यांनी थोडक्यात मांडले आहे. हे मांडत असतानाच त्यांनी आणखी एका गोष्टीकडे लक्ष वेधले आहे. एखाद्या वैचारिक प्रवाहात चार-पाचशे वर्षे निर्माण होत राहिलेली सर्व पुस्तके समूळ नाहीशी करणे ही अशक्य वाटणारी गोष्ट भारतीयांनी शक्य करून दाखवली, या मुद्द्याकडेही ते येतात. भारतातून नाहीशा झालेल्या बौद्ध वाङ्मयाविषयी सांगतानाच हे वाङ्मय जपण्यासाठी धडपड करणाऱ्या अभ्यासकांविषयी सांगायला ते विसरले नाहीत.

रिंढे यांचा ‘पुस्तकी कथा’ हा लेख भारावून टाकणारा आहे. झोरान झिवकोविच या सर्बियन लेखकाच्या ‘दी लायब्ररी’ या संग्रहातील कथांतील जग पुस्तकांनी भरलेले आणि भारलेले आहे, असे सांगत रिंढेंनी मांडलेला कथा परिचयही आपल्याला मोहित करतो. प्रत्येक कथेत पुस्तक हे नायक स्वरूपात येत राहते आणि एका अद्भुत जगात नेत असते, हे वाचत असताना मूळ पुस्तक वाचण्याची तीव्र इच्छा होते. झिवकोविचचे ‘दी रायटर’, ‘दी बुक’, ‘दी लायब्ररी’, ‘मिस तमारा : दी रीडर’, ‘दी लास्ट बुक’, ‘दी घोस्ट रायटर’ या इतरही कथा-कादंबऱ्यांमध्ये पुस्तक, वाचक, लेखक या गोष्टी केंद्रस्थानी आहेत. सध्याच्या सामाजिक माध्यमांवर ऊठसूठ लेखन करून स्वत:ला लेखक समजणाऱ्या किंवा तशी भाऊगर्दी करणाऱ्यांसाठी झिवकोविचचे या लेखात मांडलेले एक मत चांगलेच अंजन घालणारे ठरेल. रिंढे लिहितात, ‘लेखक होण्यासाठी पन्नास वर्षे हे वय आदर्श आहे असे तो मानतो. त्याआधीची वर्षे वाचनात घालवावीत. कारण आपण लिहायला सुरुवात करण्यापूर्वी गेल्या हजारो वर्षांतील आपल्या आधीच्या लोकांनी काय लिहून ठेवले आहे, ते वाचणे आवश्यक आहे, असे तो म्हणजे झिवकोविच मानतो.’ आज वाचन म्हणजे अभ्यास न करता सतत मत मांडणाऱ्यांसाठी झिवकोविच अत्यंत मोलाचा सल्ला देत आहे.

‘एका तरण्या कादंबरीकाराचा कबुलीजबाब’ या लेखात कादंबरीकार उम्बर्तो इको हे लेखनासाठी किती अपरिमित कष्ट घेत होते, याचा उलगडा सुरेखपणे केला आहे. कुठल्याही नवख्या कादंबरीकारासाठी मार्गदर्शक ठरू शकेल, असा हा लेख आहे. हा लेख वाचताना अशा निर्मितीप्रकारावर आपल्याकडेही लेखन होणे आवश्यक आहे, असे वाटते. रिंढे यांना ‘इकोचा’ ही कादंबरी म्हणजे कबुलीजबाब नव्हे, तर कोण्याही वाचनप्रेमी व्यक्तीला वाचनाचे आपल्या आयुष्यातील स्थान काय याविषयी विचार करायला लावणारे एका प्रगल्भ लेखकाचे चिंतन वाटते. 

‘वाचक जेव्हा कादंबरीचे पात्र बनतो’ या लेखातून पाश्चात्य लेखनात वाचकाला कसे महत्त्व दिले गेले आणि मराठी लेखनात त्याचा कसा अभाव आहे, याविषयीही त्यांनी मांडणी केली आहे. तसेच ‘प्राध्यापकाचा बनला पुस्तकविक्या’ यातून एका प्राध्यापकाचा दुर्मीळ पुस्तकांचा संग्रह आणि विक्रीचा प्रवास मांडला आहे. ‘अत्तरविक्याचं प्रूस्तप्रेम’ या लेखात झॅक ग्युरीन या पुस्तकवेडाने , मुख्यत: मार्सेल प्रूस्त या लेखकाने झपाटलेल्या इसमाची कहाणी आलेली आहे. त्याने शेकडो दुर्मीळ पुस्तके, चित्रे, जुन्या वस्तू जमवल्या होत्या. त्याने जमवलेला व जतन केलेला प्रूस्तसंग्रह मार्सेल प्रूस्तवर संशोधन करणाऱ्यांना नंतर खूपच उपयुक्त ठरला. ‘फिक्शन’मधील पुस्तके या लेखात आशयसूत्रात पुस्तक असणाऱ्या कादंबऱ्यांचा आढावा घेतला आहे. ‘समासातल्या नोंदी केवळ’ या लेखातून पाश्चात्य देशात कथाकादंबऱ्यांवर लिहिलेल्या नोंदी किती गांभीऱ्याने घेतल्या जातात, हे आपल्याला कळते. तसेच पुस्तकांच्या वाचनावरून संशोधक, समीक्षकांनी केलेल्या चरित्र लेखनावरचा ‘पुस्तकांनी रचलेली चरित्रं’ हा लेखही वाचनीय आहे.

या संग्रहात एकूण २३ लेख आहेत. पुस्तक या एका गोष्टीचे किती तरी पैलू आहेत आणि त्या प्रत्येक पैलूविषयी लोकं किती आस्था बाळगून आहेत, त्यासाठी किती कष्ट घेऊन लेखन करत आहेत, याची जाण आपल्याला ‘लीळा पुस्तकांच्या’ हे पुस्तक देते. शिवाय रिंढे यांनी अत्यंत सुबोध, सोप्या भाषेत लेखन केले आहे. त्यामुळे विविध पुस्तके आणि लेखकांचा परिचय करून देणारे पुस्तक असूनही ते कंटाळवाणे होत नाही. याउलट त्यांनी प्रत्येक लेखात आपल्याकडील स्थिती, किस्से, लेखक आणि पुस्तकविक्रेत्यांच्या आयुष्यात घडलेल्या काही गमतीजमती, काही लेखकांचे-संग्रहाकांचे तऱ्हेवाईक वागणे, पुस्तकासाठी जंग जंग पछाडणारे, पिच्छा पुरवणारे संग्राहक यांची वर्णने केली आहेत. त्यामुळे लेख वाचत असताना आपण कुठेच अॅकॅडमिक काही तरी वाचतोय, असे वाटत नाही.

रिंढे पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात, ‘पाश्चात्य आणि मराठी पुस्तक संस्कृतीचे हे दर्शन माझ्याप्रमाणेच या पुस्तकाच्या वाचकांनाही विचारात पाडेल, तर माझा हेतू सफल झाला असे म्हणता येईल.’ तो हेतू हे पुस्तक निश्चित सफल करतेच; शिवाय या पुस्तकातून मिळालेल्या रोचक माहितीवरून ती-ती पुस्तके शोधून वाचण्याची जिज्ञासाही वाचक म्हणून निर्माण होते हे निश्चित!

- हिनाकौसर खान-पिंजार
ई-मेल : greenheena@gmail.com

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZOPBI
Similar Posts
मी आणि नथुराम - शरद पोंक्षे यांचे नवे पुस्तक गेल्या २० वर्षांपासून सातत्याने आपले विचार निर्भीडपणे मांडणाऱ्या शरद पोंक्षे या एका मनस्वी कलावंताने आपले अनुभव ‘मी आणि नथुराम!’ या पुस्तकाद्वारे मांडले आहेत. त्यांचे हे पुस्तक शब्दामृत प्रकाशनतर्फे २० एप्रिल २०२१ रोजी प्रकाशित होत आहे. बुकगंगा डॉट कॉमवर या पुस्तकाची पूर्वनोंदणी केल्यास ४५० रुपयांचे हे पुस्तक ३५० रुपयांत मिळणार आहे
महर्षी अरविंद यांचे अजरामर महाकाव्य - सावित्री महर्षी अरविंद (१५ ऑगस्ट १८७२ ते पाच डिसेंबर १९५०) यांना सारे जग एक श्रेष्ठ अध्यात्मिक गुरू म्हणून ओळखते. त्यांनी लिहिलेले सर्वांत प्रसिद्ध महाकाव्य म्हणजे ‘सावित्री’. सुमारे २४ हजार ओळींचे हे खंडकाव्य म्हणजे दिव्य आध्यात्मिक चिंतन आहे. अनेक वर्ष ‘सावित्री’चे इंग्रजीत लेखन सुरू होते. पुढे मराठीसह अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले
लीलावती भागवत, कविता महाजन बालकुमार साहित्यात मोलाची भर टाकणाऱ्या लीलावती भागवत, सामाजिक विषमता आणि स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या कविता महाजन, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक भालचंद्र बहिरट, गोव्याविषयी विशेष संशोधन करणारे अनंत प्रियोळकर आणि ‘गावगाडा’कार त्रिंबक आत्रे या साहित्यिकांचा पाच सप्टेंबर हा जन्मदिवस. त्यानिमित्त आज ‘दिनमणी’मध्ये या सर्वांचा अल्पपरिचय
नरेंद्र बोडके ‘समुद्राचा दुपट्टा सतत सळसळता, आपण पाठवतो पावसाच्या लिपीतले संदेश, खरं तर आपण नसतोच- सगळी असण्याची चलबिचल, आपल्या पलीकडे, आपण निरभ्र, शांततेहून पारदर्शी, मौनाइतके बोलके,’ असं मांडणारे कवी आणि पत्रकार नरेंद्र बोडके यांचा २३ डिसेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language